आईवडिलांची आर्त साद: चिमण्यांनो परत फिरा रे...!

आई वडिलांची आर्त साद: चिमण्यानो परत फिरा रे...!

आई-वडील आपल्यासाठी आयुष्यभर झिजतात, आपल्या प्रत्येक यशात आनंदून जातात, स्वतःच्या आकांक्षा बाजूला ठेवून, आपलं आयुष्य आपल्या सुखासाठी खर्ची घालतात. त्यांचा त्याग आणि समर्पित वृत्ती शब्दांत न मावणारी आहे. 

पोटाला चिमटा लावून मुलांचे हट्ट पुरवणारे, त्यांच्या भविष्यासाठी स्वप्नं बघणारे. त्यांच्या प्रत्येक थकलेल्या श्वासात एकच मागणी — "माझी मुलं सुखी असावीत..." देवाकडे स्वतःसाठी काहीही मागत नसतात. जे काही मागायचे ते केवळ मुलांसाठी. 

पण आज... तेच आईवडील एकटे पडले आहेत. केस गळलेत, दात पडलेत, डोळ्यांची नजर मंदावलीय... पण मुलांची आणि नातवंडांची वाट पाहणं मात्र काही थांबलेलं नाही.

ज्यांचं आयुष्य मृत्यूच्या अगदी जवळ आहे असे आईवडील मुलाबाळांची वाट पाहतायत. त्यांच्या आयुष्याचा सूर्य कधी मावळेल सांगता येत नाही. आज मावळलेला सूर्य दुसऱ्या दिवशी उगवतोच. पण एकदा का आईवडील आपल्याला सोडून गेले तर... ते पुन्हा कधीही भेटणार नाहीत. दिसणार नाहीत. मित्रांनो, ईवडील वाट पाहत आहेत तुमच्या एका फोनची, एका भेटीची, एका प्रेमाच्या मिठीची!

घराच्या भिंतीशीच त्यांचे संवाद होत आहेत. ताटात एकटं जेवण करताना डोळ्यांत पाणी येतं. मन सतत विचारात – माझी मुलं आता परत येणार का...?, कुठं असतील?, कशी असतील?, काय खातपीत असतील? अशा असंख्य विवंचनानी त्यांच्या जीवाला घोर लागलाय. 

नातवंडांना पाहण्याची आस डोळ्यांत झळाळते, पण वयोवृद्ध आई वडिलांना भेटण्यासाठी वेळ कुणाकडेच नाही. म्हणूनच त्यांचा जीव सैरभैर होतो, अगतिकतेने त्यांच्या हृदयातून आर्त साद उमटते... "चिमण्यानो, घरट्याकडे परत फिरा रे..."

वृद्धापकाळात त्यांना औषधांपेक्षा तुमचं प्रेम, आरामाच्या खुर्चीपेक्षा तुमचं साथ, आणि त्यांना कुणाचं दान नको — फक्त तुमचं भान हवंय.

आई-वडील काही मागत नाहीत मित्रांनो... फक्त थोडा वेळ, एक हास्य, एक मिठी, एक आठवण. त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसा, सुखाचे चार घास भरवा— जिथे असाल तिथून आजच एक कॉल करा, वेळ काढून भेट द्या कारण...

कारण कदाचित उद्या उशीर होईल... कारण एकदा का ते सोडून गेले... तर ते पुन्हा कधीच भेटणार नाहीत! 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ज्ञान हेच खरे अक्षय्य आणि अमूल्य धन

सोशल मीडिया: घरबसल्या कमाईचे एक आधुनिक आणि प्रभावी साधन

काम करा बुद्धीने आणि जीवन जगा शुद्धीने