माणूस चंद्रावर आणि मंगळावर पोहचला पण...

माणूस चंद्रावर आणि मंगळावर पोहचला पण...

"कोट्यवधी मैलांवरील तारे, उपग्रह पाहण्यासाठी मानवाने दुर्बीण बनवली खरी... पण शेजारी बसलेल्या माणसाच्या मनात नेमके काय चालले आहे हे शोधून काढणारी दुर्बीण मात्र माणूस बनवू शकला नाही."

माणूस पोहोचला ताऱ्यांपर्यंत, उपग्रहांपर्यंत… पण मनाच्या अंतराळात अजूनही भरपूर अंधार आहे! आज विज्ञानाच्या प्रगतीने आपण कोट्यवधी मैलांवरील ताऱ्यांपर्यंत पोहोचलो आहोत. दुर्बिणीच्या साहाय्याने आपण आकाशाचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण चंद्रावर पाऊल टाकले, मंगळावर मोहीम पाठवली… पण अजूनही एक जागा आहे, जिथे आपण पोहोचू शकलो नाही ती म्हणजे माणसाचे मन. आकाशा पेक्षा कितीतरी विस्तृत, पॅसिफिक समुद्रापेक्षा किती तरी सखोल, विमानापेक्षा किती तरी पटीने वेगाने धावणारे मन माणसाला लाभले आहे ज्याचा थांगपत्ता कुणाला लागुच शकणार नाही. 

आपण यंत्रं, तंत्रज्ञानं आणि नवनवीन साधनं निर्माण केली. अदृश्य पाहिलं, अमाप मोजलं… पण आजवर असं कोणतंही उपकरण निर्माण झालेलं नाही, जे आपल्यासमोर बसलेल्या माणसाच्या मनात काय चालले आहे हे समजू शकेल.

ज्ञान वाढलं… पण संवेदनशीलता हरवली!
शाळा, कॉलेज, पदवी, कोर्सेस… आपलं ज्ञान अमाप वाढलंय. पण त्यासोबतच आपली समज, सहवेदना आणि संवेदनशीलता मात्र कमी होत गेली. विज्ञानाने आपल्याला खूप पुढे नेलं, पण माणूसपण हरवत गेलं. भावना समजून घेण्यासाठी डोळ्यांपेक्षा हृदय लागते.

संवादाची साधनं वाढली… पण अंतर्मनातील संवाद हरवला!
आज आपल्या हातात WhatsApp, Instagram, Zoom, Teams — संवादासाठी हजारो साधनं आहेत. पण खरी संवादाची साधनं म्हणजे आपुलकी, ऐकून घेण्याची तयारी, आणि मनापासून समजून घेण्याची भावना हरवत चालली आहेत. आपण खूप बोलतो, पण खूपच कमी ऐकतो.

मानवी मन सर्वात रहस्यमय ग्रह!
स्पेसक्राफ्ट नवीन ग्रह शोधतात… पण माणसाचं मन हा एक असा अवकाश आहे, जो आजही सर्वात अधिक गूढ आणि खोल आहे. या अंतराळातून प्रवास करायचा असेल, तर आपल्याला संवाद, प्रेम, समजूत आणि विश्वास या इंधनाची गरज आहे.

एक क्षण थांबा… विचार करा…
१. आजुबाजूचे लोक खरंच ठीक आहेत का...?
२. कोणी हसतंय… पण आतून त्याचं मन विषण्ण आहे. 
३. कोणी शांत आहे… पण त्याच्या मनात बरंच काही सांगायचं आहे…

परस्परात संवाद सुरू ठेवा - 
एकमेकांशी सुसंवाद साधा अगदी मनापासून. असा संवाद, जो शब्दांपलीकडे जाऊन मनाला जोडतो आणि हृदयाला स्पर्शून जातो. 

शेवटी फक्त एकच विचार:
"ताऱ्यांपर्यंत पोहोचा… चंद्रावर पोहोचा, मंगळावर पोहोचा, आकाशाला गवसणी घाला, आसमंताला कवेत घ्या, आ जग पादाक्रांत करा पण स्वतःच्या मनात डोकावायला विसरू नका… कारण शेवटी आपण सगळे एकमेकांच्या अंतर्मनातील विश्वातले केवळ पाहुणे आहोत."

प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी
महाड - रायगड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ज्ञान हेच खरे अक्षय्य आणि अमूल्य धन

सोशल मीडिया: घरबसल्या कमाईचे एक आधुनिक आणि प्रभावी साधन

काम करा बुद्धीने आणि जीवन जगा शुद्धीने